नाशिक - 'बाळा मी ड्युटीवर जातेय ना...', असं म्हणत चिमुकल्याला समजवणारी आई...अन् रडत रडत दोन्ही हातांनी आईच्या चेहऱ्याला कुरवळणारं बाळ...कितीही समाजवून बाळ काही समजत नाही. मात्र, रडणाऱ्या बाळाला पतीजवळ देवून तिला कर्तव्यावर जावे लागतेय...हे दृश्य बघून अनेकजण भावूक झालेत...अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला.
नाशकातील आडगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक चांदणी सुभाष पाटील यांचा हा व्हिडिओ आहे. सध्या देशावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. त्यातच राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर कामाचा प्रचंड दबाव आहे. घरी आपल्या चिमुकल्यांना सोडून अनेक पोलीस भगिनी कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत. आपल्या कुटुंबापेक्षा त्या कर्तव्याला जास्त प्राधान्य देत आहे. त्यात चांदणी पाटील या देखील आपल्या चिमुकल्याला सोडून दररोज १२ तास आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यामध्ये त्यांचे पती या १२ तासात आईची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या लहान बाळाला सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर असतो. मात्र, तुम्ही घरात राहा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक चांदणी पाटील यांनी केले आहे.