नाशिक - सत्ताधारी ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. ठाकरे व अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असून आरक्षणाबाबत त्यांच्या मनात पाप असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा मराठा आरक्षण समितीचे सदस्य विनायक मेटे यांनी केले. अशोक चव्हाण निष्क्रिय असून एकनाथ शिंदे यांना समितीचे अध्यक्ष करावे, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण समन्वय समितीची पुढील दिशा त्यांनी स्पष्ट केली. 9 संघटनांनी एकत्र येऊन मराठा समन्वय समिती स्थापन केली आहे.
ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळेल. त्यामुळे येत्या ६ ऑगस्टपासून महाराष्ट्रात मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बैठकीत सांगतात सरकारची सर्व तयारी झालेली आहे. पण दुर्दैवाने शासनाचे वकील सांगतात की आमची तयारी झालेली नाही. याचा अर्थ ठाकरे सरकार समाजाशी खोटे बोलत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अनुभवी वकिलांना बाजूला केले जात आहे. सरकारमधील काही लोक विरोधातील लोकांना मदत करत आहेत. अशोक चव्हाण आरक्षणाचा अभ्यास करत नाहीत. ते आरक्षण प्रश्नी गंभीर नाहीत. नाकाम आणि निष्क्रिय असलेल्या अशोक चव्हाण यांना जबाबदारीतून मुक्त करावे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी. मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार -
येत्या ६ ऑगस्टला जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील कार्यालयांमध्ये निवेदन दिले जाईल. ७ ऑगस्टला राज्यातील सर्व आमदार, खासदारांना पत्र दिले जाईल. त्यानंतर लाखो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना फोन करून मागणी करावी. ९ ऑगस्टला क्रांती दिनाच्या औचित्याने आंदोलन केले जाईल, अशी माहितीही यावेळी मेटे यांनी दिली.