नाशिक : इगतपुरी तालुक्यातील धारगावच्या बोरवाडी पाड्यावर भूतबाधा केल्याच्या आरोपाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून आठ ते दहा कुटुंबांवर गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. काही दिवसापूर्वी या गावातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला हे कुटुंब जबाबदार आहे, असा आरोप मृत मुलाच्या आईकडून करण्यात येत आहे. तसेच माझ्या मुलावर भूतबाधा केल्याचा आरोप त्या आईकडून सातत्याने करण्यात येत आहे. यावरून अनेकदा वादविवादही झाले, सततच्या आरोपाला हे कुटुंब कंटाळले त्यांचा मानसिक छळ होऊ लागला, याप्रकरणी काही दिवसापूर्वी पोलिसांनी या दोन्ही गटाला समज दिली होती. मात्र तरीही आठ-दहा कुटुंबावर आरोप होत असल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे आठ ते दहा कुटुंबाना आपले घर सोडून तेथून स्थलांतर करावे लागले.
अंनिसकडून चौकशीची मागणी : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ सुरगाणा या तालुक्यात आजही अंधश्रद्धांचा मोठ्या प्रमाणामध्ये पगडा आहे. इगतपुरीच्या या संपूर्ण प्रकरणी काही सामाजिक संघटनांनी देखील हस्तक्षेप करत त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही, आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य घटनास्थळी जाऊन महिलेसह गावकऱ्यांची समजूत काढणार असल्याचे अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले तुम्ही भुताटकी करता : आम्ही मोलमजुरी करून कष्ट करतो, आरोप करणाऱ्या महिलेच्या मालकीच्या जागेत भाड्याने राहत होतो. घर मालकाचा मुलगा दोन वर्षांपासून आजारी होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, पण ते म्हणतात की तुम्ही भुताटकी करून त्याला मारले. यावरून ते रोज आमच्या घरी येऊन आम्हाला शिवीगाळ करत होते, सोडून निघून जा असे सांगत होते. म्हणून आता आम्ही गाव सोडून निघून गेलो, घरातील सामान वाहण्यासाठी गाडी देखील त्यांनी आणून दिली नाही. आम्ही डोक्यावर सामान घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेलो, असे पीडित कुटुंबातील सदस्यांनी संगितले.
जनजागृती करावी : धारगावच्या बोरवाडी पाड्यावर दहा ते बारा आदिवासी कुटुंब राहतात. याच ठिकाणी एका आदिवासी महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला, त्या महिलेने पाच ते सहा कुटुंबावर आरोप केला की, तुम्ही भुताटकी करून मुलाला मारले. याबाबत पोलिसांनी देखील महिलेची समजूत काढली. मात्र ती महिला तरी देखील या कुटुंबाना त्रास देत होती, यामुळे मागील वर्षी बांधलेले घर देखील मोडून पाच ते सहा कुटुंब दुसऱ्या गावी स्थलांतरित झाले आहे. या भागात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे. आदिवासी विभागाने या भागात जनजागृती मोहीम राबवून या ठिकाणच्या नागरिकांमधील अंधश्रद्धा दूर करावी, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे.