नाशिक - कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, या काळात माणसांबरोबर पशु पक्ष्यांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. नाशिकच्या मेरी म्हसरुळ परिसरात मोठ्या संख्येत मोर एकत्र जमू लागले आहेत. स्थानिक नागरिक माणुसकीच्या धर्माला जागत दानापाणी करत असल्याने मोरांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे.
पक्षी प्रेमींनीदेखील लॉकडाऊनमुळे पाठ फिरवल्याने मोरांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याच ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी मोरांना मेरी परिसरातील स्थानिक नागरिक आणि सुरक्षारक्षक गहू, तांदूळ, शेंगदाणे, मका, ज्वारी यासारखे धान्य टाकत आहेत. ते खाण्यासाटी ७० ते ८० मोर मोठी गर्दी करतात. एकाच ठिकाणी मोरांची गर्दी होत असल्याने कधी न बघावयास मिळणारे चित्र मेरीत पाहायला मिळत आहे.