नाशिक - देवळा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सिंहाचा मुक्त वावर व डरकाळीचा एक व्हिडिओ स्थानिक पातळीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर हा व्हिडिओ बनावट असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सिंहाचा मुक्त वावर व डरकाळीचा एक व्हिडिओ नाशिकच्या देवळा तालुक्यातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. विशेष म्हणजे याच काळात परिसरातील पाळीव प्राण्यांनादेखील फस्त केल्याचे काही उदाहरण दिले जात आहे. मात्र, वनविभागाकडून देवळा तालुक्यात सर्वत्र जंगल गस्त करण्यात आली आहे. असा कुठलाही प्राणी इथे नसून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा बनावट (फेक) असल्याची पुष्टी वनविभागाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा - Unlock : दारुची दुकानं उघडली, आता मंदिरंही उघडा - धर्मगुरू अनिकेत शास्त्री
नागरिकांना दिलासा तर वनविभागाचे आवाहन -
देवळा तालुक्यातील दहिवड भवरी मळा या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केल्याच्या घटना घडली आहे. ती दुसऱ्या एखाद्या हिंस्त्र प्राण्याची (बिबट्याची) असू शकते. मात्र, सिंहाची नाही अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. या परिसरात आधी बिबटे आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लहान मुले व वृद्धांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये तसेच पाळीव जनावरांना बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात यावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे. तर वन विभागाकडून परिसरात गस्त सुरू केल्याने नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.