नाशिक - वडनेर रस्त्यावरील शिवजन्मोत्सव समितीचा अवकाळी पावसामुळे पडलेला फलक लावताना विजेचा धक्का लागल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोन युवक जखमी झाले आहेत. ह्या घटनेमुळे नाशिकरस्ता परिसरात शोककळा पसरली आहे.
नाशिकरस्ता भागातील वडनेर रस्त्यावरील राजवाड्याकडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने हा फलक पडला होता. आज दुपारी रस्त्याने जाणाऱ्या युवकांनी पडलेला फलक उचलला आणि उभा केला त्यावेळी वरून जाणाऱ्या वीज तारांचा या फलकाला स्पर्श झाला आणि त्याचा जोराचा विजेचा धक्का या तरुणांना बसला. त्यात अक्षय किशोर जाधव (वय २६) राहणार वडनेर, राज मंगेश पाळदे (वय २०) राहणार सौभाग्य नगर या तरुणांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण किरकोळ जखमी झाले.
या घटनेने नाशिकरस्ता भागात हळहळ व्यक्त होत आहे. मयत राज पाळदे हा परिवारातील एकुलता एक मुलगा होता, तर जाधव यांच्या पश्चात दोन भाऊ आहेत. ह्यावेळी रुग्णालयामध्ये सर्व शिवभक्त अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती.