अकोला - आज सकाळी चारचाकी मागे (रिव्हर्स) घेताना धक्का लागल्यामुळे दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील ओमनगर भागात ही घटना घडली आहे.
ओम नगरमधील देशमुख यांच्या शुद्ध पाण्याच्या प्लांटवर थार येथील चारचाकी मॅक्सिमो (क्रमांक एम एच ३० ए बी १०७७) घेऊन चालक पाण्याच्या कॅन घेण्यासाठी आला होता.
सदर ठिकाणी चालक रिव्हर्स घेत होता. यावेळी अधिरा संदीप टिकार ही दोन वर्षीय चिमकुली गाडीच्या मागे आल्याने तिला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.
तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस करीत आहेत.
संदीप टिकार यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षीय अधीरा ही एकुलती एक मुलगी होती. तिच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.