नाशिक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील भारतनगर भागात राहणारा फैजान नाईन शेख हा संशयित हातात तलवार घेत त्याचे रील बनवून इंस्टाग्राम वर अपलोड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने फैजान याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक स्टीलची धारदार तलवार हस्तगत करण्यात आली. चौकशीमध्ये ही तलवार त्याचा मित्र सचिन शरद इंगोले (वय 28) भारत नगर यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी इंगोले याला देखील अटक केली आहे.
या पोलिसांनी बजावली कामगिरी : नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट 4/ 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, नाझीम खान पठाण, असिफ तांबोळी, प्रशांत मरकड, महेश साळुंखे, विशाल देवरे मुख्तार शेख यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
पोलिसांकडून आवाहन : कोणीही अवैध प्राणघातक शस्त्राचा वापर करू नये किंवा त्याचे प्रदर्शन करू नये असा कायदा आहे. असे आढळून आल्यास पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अवैध धंद्यांवर छापेमारी : नाशिक पोलिसांकडून गेल्या दोन दिवसांपासून अवैध धंद्यांवर छापेमारी करण्यात येत आहे. अशात पेठ रोड भागात मसाज पार्लरच्या नावाखाली एका फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी एक बोगस ग्राहक संबंधित फ्लॅटमध्ये पाठवला. संशयित महिलेने ग्राहकाला दोन मुली दाखवल्या. ग्राहकाने इशारा केल्यानंतर पथकाने छापा टाकत दोन महिलांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह फ्लॅटभाडे करारावर देणाऱ्या महिलेच्या विरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अंबड भागातील बुरकुले हॉल परिसरात पोलिसांनी एक कारवाई केली. यात संशयित महिला आणि तिचा पती घरात महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत खात्री केल्यानंतर छापेमारी करण्यात आली. फ्लॅटमधून एक महिला व दोन तरुणींना ताब्यात घेत त्यांची सुटका केली. वरिष्ठ निरीक्षक भागीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
हेही वाचा : Mumbai Crime : सदिच्छा सानेची हत्या प्रकरणाचे सत्य समोर; जीवरक्षकानेच केला खून