नाशिक - शहर परिसरातील विविध भागातुन दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली. सुनील बाळासाहेब देशमुख आणि जकीर अख्तार शेख अशी आरोपींची नावे आहेत. तसेच यावेळी दोघांपासून दोन लाख 15 हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकीसह जप्त करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांनी आता चोरट्यांना गजाआड करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
भद्रकाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार या दोन्ही दुचाकी चोरांना त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी शहरातील विविध भागातून चोरलेल्या सुमारे दोन लाख 15 हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या.
तर तपासाअंती या दोन्ही चोरट्यांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही उघड झाली. सदर कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार, गुन्हे शोध पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकाने पार पाडली. तर पुढील तपास सुरू आहे.
शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस करत असलेल्या या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.