मालेगाव ( नाशिक ) : मालेगावात गुंडागर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, पुन्हा एकदा तलवारी परजल्या आहेत. गुंडांच्या टोळक्याने दोन भावांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या आधीदेखील असेच तलवारी घेऊन मारामाऱ्या झाल्या होत्या मालेगावात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, कोंबिंग ऑपरेशनची गरज आहे.
मालेगावमध्ये गुंडागर्दी चालूच : मालेगावात खुनाचे सत्र सुरूच असून, रात्री सलीम मुन्शीनगर भागात तलवारी परजून गुंडाच्या टोळीने दोन भावांवर हल्ला केला. त्यात मोठ्या भावाचा मृत्यू झाला, तर लहान भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्याला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहंमद इब्राहिम असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, हल्ल्यात जखमी झालेला अब्दुल अजीज हा मृत्यूशी झुंज देत आहे.
मागच्या भांडण्याचा राग यातून केला हल्ला : मागील भांडणाची कुरापत काढून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेले आरोपी अफजल खान, कासीम खान व इतरांचा पोलीस शोध घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालेगावात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी : मालेगावमध्ये गुंडागर्दी वाढल्याने सामान्य माणसांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. मालेगावमधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सध्या कोंबिंग ऑपरेशन करून पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मोठी घटना घडणार नाही.