येवला(नाशिक) - येवला तालुक्यातील सत्यगाव येथील दोघांना मांडूळ साप तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून मांडूळ जातीचे दोन साप जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत 'ईटीव्ही भारत'ला मिळालेली अधिक माहिती अशी की, सत्यगावातील दोन युवकांनी मांडूळ जातीचे साप आपल्या घरात पकडून ठेवले असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युवकांच्या घरी छापा मारला.
यावेळी युवकांनी मांडूळ जातीचे साप हे एका माठामध्ये ठेवल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही तरुणांना वनविभागाने पकडून त्यांच्याकडून मांडूळ जातीचे सर्प हस्तगत केले आहेत. तर या दोन्ही युवकांवर मांडूळ सापाची तस्करी व मांडूळ जातीचे साप बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार या दोन तरुणांना आज न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा जून पर्यंत वन विभागाची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व वन कर्मचारी करीत आहेत.