नाशिक - कसारा घाटात एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे या कंटेनरची रस्त्यावरून धावणाऱ्या २० ते २५ गाड्यांना धडक बसली. यामुळे वेगवेगळ्या वाहनांमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास १५ मिनिटे रस्त्यावर या कंटेनरचा थरार सुरू होता. एका गॅस टँकरला धडक बसल्यानंतर अखेर हा कंटेनर थांबला.
याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी ९ च्या सुमारास नाशिककडून मंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या कंटेनरचे (एमएच ४६ एच २९८८) कसारा घाटात ब्रेक निकामी झाले. कंटेनरवरला चालकाचा ताबा सुटल्याने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक बसली. एकामागोमाग एक अनेक गाड्यांना जबर धडक दिल्याने या गाड्यांमधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तत्काळ इगतपुरी येथील स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात तीन महिला व दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सुमारे दोन तासानंतर घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात कसारा पोलीस प्रशासनाला यश आले. दरम्यान, संबंधित विभाग किंवा टोल वसुली करणारे कंत्राटदार यापैकी घटनास्थळावर कोणीही उपस्थित नव्हते. अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या क्रेन अतिशय जुन्या आणि कालबाह्य स्वरुपाच्या असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.