मनमाड(नाशिक) - गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेल्या लालपरीला राज्य शासनाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, प्रवाशांनी पाठ फिरवल्याने लालपरीचे चाके काही केल्या फिरेना. यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. एका महिन्यात एकच मनमाड ते येवला बस धावली. त्यात फक्त ११ प्रवाशांनीच प्रवास केला. त्यामुळे आधीच घाट्यात असलेले महामंडळ अजून घाट्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर रेल्वे, बस, टॅक्सी यासारख्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या. तब्बल दोन महिन्यानंतर राज्य सरकारने २२ मे रोजी लालपरीला जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे आधीपासूनच घाट्यात असलेले एसटी महामंडळ पुन्हा घाट्यात आले आहे. परवानगी मिळाली तेव्हापासून मनमाड आगारातून एकच बस निघाली. ती मनमाड ते येवला धावली. मात्र, यात जाताना ११ व येताना १ इतक्याच प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे अवघे ३६० रुपये उत्पन्न मिळाले आणि खर्च जवळपास २५०० रुपये झाला. त्यात सरकारने एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी प्रवास करतील, असा आदेश काढला. त्यामुळे देखील उत्पन्न घटले आहे.
प्रवाशांनी बसने प्रवास करावा यासाठी आम्ही सर्व सरकारी नियमानुसार बससेवा सुरू केली आहे. त्यात प्रामुख्याने बसेस सॅनिटायझर करणे, प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करणे, सामाजिक अंतर ठेवणे यासारखे उपाय सुरू आहेत. प्रवाशांनी आता कुठलीही भीती न बाळगता आता बसने प्रवास करावा, असे आवाहन मनमाड बस आगारचे प्रमुख प्रीतमकुमार लाडवंजारी यांनी केले आहे.