नाशिक - मालेगाव शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मालेगावमध्ये ३२ रुग्णांची वाढ झालेली आहे. नुकत्याच आलेल्या अहवालामध्ये ११ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४१५ वर पोहोचली आहे. तर, नाशिक जिल्ह्यात एकूण ५०२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यावर मात करण्यासाठी आता प्रशासकीय हालचालींचा वेग वाढला आहे.
नाशिक जिल्ह्याची सध्याची आकडेवारी
नाशिकात शहरातील २१, नाशिक ग्रामीणमध्ये ५०, मालेगावात ४१५ तर इतर जिल्ह्यातील १४ रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील नागरिक उपचारासाठी अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याने रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. नागरिकांना सर्दी ,ताप, खोकला ही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी लवकरात लवकर प्राथमिक तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे