नाशिक - नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे धरणातील हजारो क्यूसेस पाणी हे नदीमध्ये सोडले जात आहे. ( Rain In Nashik ) त्यामुळे गोदावरी नदीसह इतर उप नद्यांना पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी पुलावरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
इथे घडल्या दुर्घटना - नाशिक जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसात पुराच्या पाण्यात सात जण वाहून गेले आहेत. ( Seven People Carried Away ) यात दिंडोरीतील कोचरगाव येथे विशाखा लिलके ही सहा वर्षीय मुलगी आळंदी नदीच्या प्रवाहात वाहून गेली ,त्यानंतर निफाड तालुक्यातील रोहित कटारे याचा गोदावरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय, औरंगाबाद रोडवरील शिलापूर येथे घराजवळ खेळत असताना नाल्याच्या पाण्यात तोल जाऊन 12 वर्षीय कृष्णा गांगुर्डे या मुलाचा मृत्यू झालाय, सुरगाणा तालुक्यात पुलावरून मोटरसायकल जात असताना दोन जण वाहून गेलेत,पेठ तालुक्यात पळशी येथील नाल्याच्या पुरात एक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे एक जण नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे..
नागरिकांनी काळजी घ्यावी - नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला आहे. अजून पुढील दोन दिवस नाशिकला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. तसेच, पूर बघण्यासाठी नदीकाठी गर्दी करू नये असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.