नाशिक : नाशिकच्या बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने टोमॅटोचे दर कमी ( Tomato Price Crash ) झाले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टोमॅटोच्या उत्पादनानुसार शेतकऱ्याच्या टोमॅटोला 2 ते 3 रुपये किलोचा भाव मिळत आहे. तेच सर्वसामान्य ग्राहकाला हाच टोमॅटो 20 रुपयांनी खरेदी करावा लागत आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या नफेखोरी मुळे ग्राहकाला सुद्धा जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
आवक वाढताच दर घसरले : सध्या बंगलोरमध्ये देखील टोमॅटोचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील स्थानिक टोमॅटोची आवक वाढली आहे, आणि हेच कारण टोमॅटोचे दर उतरण्यामागे असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील टोमॅटो उत्पादक भागाचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यामुळे बंगलोरचा हंगाम अगोदरच आटोपला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. मात्र यंदाची परिस्थिती अवघड आहे. उत्पादन खर्च निघण्याची ही शास्वती शेतकऱ्यांना राहिली नसल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत टोमॅटोचे दर : पीक आल्यानंतर शेतकऱ्याला 20 किलो जाळी टोमॅटो काढण्यासाठी प्रति जाळी 20 रुपये मजुरी द्यावी लागते. त्यानंतर प्रति जाळी 5 रुपये भराई खर्च येतो. तर टोमॅटो बाजारात आणण्यासाठी प्रति जाळी 20 रुपये खर्च येतो. साधारण 45 रुपये प्रति जाळी खर्च येतो तेव्हा शेतकऱ्याला 50 ते 60 रुपये अपेक्षित असतात. शेतकऱ्यांचा टोमॅटो 2 ते 3 रुपयांनी ठोक व्यापारी खरेदी करतात. नंतर हाच टोमॅटो इतर शहरातील किंवा राज्यातील व्यापाऱ्यांना 6 ते 7 रुपयांना विकला जातो. नंतर दुसरा व्यापारी 10 ते 11 रुपयांना टोमॅटो किरकोळ विक्रेत्याला विकतो आणि शेवटी ग्राहक हाच टोमॅटो 15 ते 17 रुपयांनी खरेदी करतो. जो शेतकरी दिवसरात्र कष्ट करून टोमॅटो पिकवतो त्याचा फायदा तर सोडा मात्र त्याचा वाहतूक खर्च देखील निघत नाही. व्यापाऱ्यांना मात्र याचा फायदा होतो. आणि शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील याचा फटका बसत असल्याचे ग्राहक सांगतात.
आधी 500 ते 600 रूपये प्रति कॅरेट भाव : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असल्याचे दिसून आले. राजस्थान, बंगलोर, शिवपुरी, गुजरात या राज्यामध्ये स्थानिक गावातील टोमॅटो येण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने जे टोमॅटो पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट विकले जात होते. ते आता 50 ते 80 रुपये कॅरेटने विकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे केलेला उत्पादन खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. औषधाचा खर्च तसेच कामगारांचा पगार कसा करावा, असा मोठा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या टोमॅटोची बाजारात आवक वाढली असल्याने टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. तीनशे रुपयांचा भाजीपाला खरेदी केल्यावर त्यावर दोन किलो टोमॅटो फ्री देण्यात येत असल्याचे किरकोळ भाजी विक्रेत्याने सांगितले.
परतीच्या पावसामुळे खर्च वाढवला : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. रात्रंदिवस मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतो. त्यात परतीचा पाऊस आल्याने पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करावा लागला. मात्र पीक काढणीला आल्यानंतर त्यांच्या हातात निराशाच आली. शेतकऱ्यांकडून 20 किलोचे कॅरेट 40 ते 50 रुपयांच्या दराने घेतली जात असले, तरी किरकोळ बाजारपेठेत मात्र ग्राहकांना 15 ते 18 रुपये किलो याप्रमाणे टोमॅटो खरेदी करावा लागत आहे.