नाशिक - अशोका मेडिकेअर या खाmगी रुग्णालयात 14 दिवस उपचार घेऊन कोरोनाशी यशस्वी लढा देणाऱ्या नाशिकच्या एक 60 वर्षीय व एक 35 वर्षीय अशा 2 महिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला.
नाशिक शहरात कोरोनाची भीषणता वाढत असताना अनेक खासगी रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. मात्र, अशोका मेडिकेअर हे रुग्णालय सातत्याने रुग्णसेवा देत आहे. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या धुळे येथील महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली आणि तिचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय प्रशासन हादरून गेले होते. त्यानंतर याठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरला देखील कोरोनाची बाधा झाली. मात्र, या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता या दोन्ही रुग्णावर यशस्वीपणे उपचार केले. उपचारा दरम्यान त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली असून ते निगेटिव्ह आले. त्यानंतर हे दोन्ही रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.
दरम्यान, या दोन्ही रुग्णाला त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर नर्स यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. तसेच काळजी घेतली तर कोरोना बरा होऊ शकतो. फक्त त्याचा सामना करण्याची ताकद आपल्यात असायला हवी, असा संदेश या रुग्णांनी यावेळी दिला.