नाशिक- जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या नद्यांमध्ये तिघे जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. यात गाडगे महाराज पूल, नाशिक रोड आणि मुंबई नाका येथील व्यक्तींचा समावेश आहे.
पहिल्या घटनेत संजय वाल्हारे (वय 40, रा. म्हाडा कॉलनी भारत नगर) हे नंदिनी नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. प्लस्टिकचा ड्रम पकडण्याच्या प्रयत्नात असताना ते नदित वाहून गेल्याचे बोलले जात आहे. जीवरक्षकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत आकाश लोंढे (वय 19, रा. फुलेनगर पंचवटी) हा आपल्या मित्रांबरोबर गोदावरी नदीत पोहायला गेला होता. त्याने गाडगे महाराज पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. रात्री उशिरा पर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो अद्याप सापडला नाही. या घटनेबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तीसऱ्या घटनेत शेतकरी परसमल अनवट (वय 45) आज दुपारी आपल्या शेतात गवत कापण्यासाठी गेले होते. काम झाल्यावर ते लाखलगाव जवळील वालवी नदीत पाय धुवायला गेले. पाय धूत असतांना त्यांचा पाय घसरला व ते नदीच्या पाण्यात वाहून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र ते अद्याप सापडले नाहीत. या घटनेबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.