नाशिक- सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मादी बिबट्या यातील एका पिल्ल्याला घेऊन गेली आहे. तर उर्वरित दोन पिल्ली अद्यापही उसाच्या शेतात आहे.
हेही वाचा- जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर परदेशी पथक, युरोपियन संघातील सदस्यांचाही समावेश
सोमठाणे-पंचाळे रस्त्यावरील वस्तीजवळ उत्तमपदाडे यांच्या उसाच्या शेतात कामगारांना ही 3 पिल्ले आढळली. यातील एक पिल्लू बिबट्या घेऊन गेला आहे. या घटनेनंतर कामगारांनी थेट गावात धूम ठोकत या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांना दिली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.
दरम्यान, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. उर्वरित दोन पिल्ले बिबट्या घेऊन जाईल या अंदाजाने वनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्यास मनाई केली आहे. परिसरातील ऊसतोड थांबविण्यात आली असून परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. तसेच पिंजरा तयार असून वनकर्मचारी आणि स्वयंसेवक कॅमेऱ्याच्या माध्यामातून लक्ष ठेऊन आहेत.