नाशिक - शहरात पीपीई किट घालून चोरटे धुमाकूळ घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज पहाटे चोरट्यांनी पीपीई किट घालून दोन ठिकाणी ज्वेलर्सची दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचा प्रयत्न फसला. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून चोरट्यांनी लढवलेल्या या शकलेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.
नाशिक जिल्ह्यात चोरटे धुमाकूळ घालत आहेत. तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या रविवार कारंजा भागातील नॅशनल युको बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी आहे. त्यानंतर आज पहाटे नाशिकच्या जेलरोड भागातील शिवाजी नगरमधील तेजस्वी ज्वेलर्स आणि काठे गल्ली भागातील मोहिनीराज ज्वेलर्स ही दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुकानांतील सर्व सोन्याच्या वस्तू लॉकरमध्ये असल्याने आणि स्थनिक नागरीकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला असून यात चोरट्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी आणि नागरीकांची दिशाभूल करण्यासाठी पीपीई किटचा वापर केल्याचे दिसत आहे. याबाबत भद्रकाली आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि चोरीसाठी वापरण्यात आलेल्या कारवरून पोलीस चोरट्यांचा माग घेत आहेत.