नाशिक - लासलगाव विंचुर रोडवरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. अशात पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन फेकून चोरटे पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,4 जून रोजी मध्यरात्री लासलगाव विंचुर रोडवरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चार ते पाच संशयितांनी खोलून चारचाकी गाडीतून नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यावेळी बँकेच्या मुख्य कार्यालयातील यंत्रणेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जलद गतीने तपास चक्रे फिरवत ठिकठिकाणी नाकाबंदी केली. पोलीस अधिकारी राहुल वाघ, यांनी खासगी कारमधून संशयित गाडीचा पाठलाग केला. त्यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन नाशिक औरंगाबाद रोडवरील बोकडदरे शिवारात पाठलाग करत असलेल्या पोलिसांच्या खासगी कारवर फेकून पोबारा केला.
एटीएम मशीन फेकले - सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ पोलीस कॉन्स्टेबल योगेश शिंदे, सुजय बारगळ, प्रदीप आजगे ,कैलास महाजन, देवडे व इतर सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने परिसरात आपापल्या पद्धतीने शोधत कार्य सुरू केले. पोलिस कॉन्स्टेबल योगेश शिंदे व सुजय बारगळ यांची गाडी विंचुर 'एमआयडीसी'मध्ये शोध घेत असताना नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गवरून निफाडच्या दिशेने चारचाकी गाडी अत्यंत हळू चालली असल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी या गाडीचा पाठलाग केला असता चोरट्यांनी गाडीतील एटीएम मशीन त्यांच्या दिशेने फेकून पोबारा केला. या एटीएममध्ये 15 लाखांची रोकड असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बँकेचा राम भरोस कारभार - चोरट्यांनी ज्या ठिकाणचे एटीएम चोरून नेले, त्या ॲक्सिस बँकेच्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याची माहिती मिळाली आहे. ज्या ठिकाणी एटीएम ठेवलेले होते, त्या ठिकाणी फाउंडेशन न घेता वरच्यावर एटीएम मशीन ठेवून देण्यात आलेले होते. त्यामुळे केवळ दहा मिनिटात चौघा चोरट्यांनी सदर एटीएम उचलून गाडी टाकून पळ काढला. कुठल्याही प्रकारची सुरक्षा बँकेत नसल्याचे समोर आले असून, सगळे काही रामभरोसे असल्याचे यातून निष्पन्न होत आहे.
हेही वाचा...