नाशिक : जिल्ह्याच्या राजीवनगर भागातील एका हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडत असताना चोरीची घटना घडली आहे. सप्तपदीचा विधी सुरू असतानाच स्टेजवरील दागिने आणि रोकड असलेली बॅग एका अज्ञात चोरट्याने पळवून नेली. या बॅगमध्ये एक लाखांची रोकड आणि तब्बल दहा लाखांचे दागिने होते अशी माहिती समोर आली आहे.
अशी झाली चोरी..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या ज्युपिटर हॉटेलमध्ये सुरेश बजाज यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडत होता. यात स्टेजवर सप्तपदीचा विधी सुरू असताना बजाज हे आपल्या पत्नीसोबत पुरोहितांच्या शेजारी बसले होते. विधी सुरू असल्यामुळे त्यांनी नववधूचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग पाठिमागे ठेवली होती. चोरट्याने हीच संधी साधत ती बॅग पळवून नेली.
यानंतर रात्री दहाच्या सुमारास विवाहाला आलेले नातेवाईक रामचंद्र बेलवले यांना एक मुलगा लेडीज बॅग घेऊन जात असताना दिसला. त्यांनी स्टेजवर येत बजाज आणि इतरांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बजाज यांनी पाठिमागे ठेवलेल्या बॅगचा तपास केला असता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. यानंतर त्यांनी बाहेर येऊन चोरट्याचा शोध घेतला, मात्र तोपर्यंत तो पसार झाला होता. यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना कळवले.
सीसीटीव्हीच्या आधारे शोध..
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली.
हेही वाचा : वीटभट्टी मालकाच्या घरी दरोडा; 3 किलो सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांची रोकड लंपास