नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशानंतर जळगावकडे एकनाथ खडसे रवाना होत असताना चांदवड चौफुली येथे एका कार्यकर्त्याची तेरा तोळ्यांची सोनसाखळी चोरीला गेली होती. ही सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला चांदवड पोलिसांनी बीडमधून अटक केले आहे.
हेही वाचा - 'शेअर बाजार येत्या काही आठवड्यांत गाठणार विक्रमी निर्देशांकाचा टप्पा'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्या स्वागतासाठी चांदवड शहरातील पेट्रोलपंप चौफुलीवर कार्यकर्ते जमले होते. त्यातील प्रसाद देशमुख यांच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याबाबत लगेचच चांदवड पोलिसांनी तपास पथक रवाना केले होते. सोबतच सत्कार कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ फोटो ताब्यात घेऊन निरीक्षण केले असता एक तरुण सोनसाखळी काढताना आढळला. त्यानुसार तपास करून या चोरट्यास बीडमध्ये पकडण्यात आले. प्रवीण विजय गायकवाड या चोरट्याकडे तपास केल्यावर त्याच्याकडे तेरा तोळे वजनाची अंदाजे साडे सात लाख रुपये किमतीची सोनसाखळी आढळली. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.