नाशिक - दोन वर्षापुर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. ग्रामीण पोलिसांनी येवला येथून आरोपीला अटक केली. जन्मठेप भोगत असलेला हा आरोपी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पळाला होता.
भुसावळ स्थानकातून होता पळाला
कुख्यात गुंड सतीश उर्फ सत्या जैन हा रायगड जिल्ह्यातील दिवे आगारच्या गणपती मंदिरातील सुरक्षारक्षकाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 2018 मध्ये गणेश मंदिरात दरोडा टाकून दोन सुरक्षा रक्षकांच्या हत्या करून तो पळाला होता. या प्रकरणी सत्या जैनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2018 मध्ये पोलिसांनी आरोपीला न्यायायलीन कामकाजासाठी नाशिक येथे आणले होते. आरोपीला नागपुरला नेण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. दरम्यान, सत्या जैन पोलिसांच्या हातून निसटून पळून गेला. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांनी सत्या जैनच्या येवल्यातून मुसक्या आवळल्या. आरोपी सत्या जैनवर खून, दरोडा आणि घरफोडी यासारखे राज्यभरात 28 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय सत्या जैनवर 25 हजार रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. येवल्यातील अनेक घरफोड्यांमध्ये त्याचा हात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
सापळा रचून घेतले ताब्यात
पोलिसांनी सापळा सचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर हल्ला करत त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करित बेड्या ठोकल्या. आरोपीने त्याचे नाव शिवा जनार्दन काळे असे सांगितले होते. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, तो दिवे आगार गणपती मंदीर दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. 2018 मध्ये पोलिसांच्या ताब्यातुन पळुन गेल्यानंतर नाव बदलुन राहत असल्याचे समोर आले आहे.