येवला (नाशिक) - अक्षय्य तृतीया सण दोन दिवसांवर आल्या कारणाने नागरिकांनी आज सकाळपासूनच भाजीपाला, फळे खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. यावेळी पोलीस येताच पोलिसांनी गर्दीची पांगापांग केली.
सामान खरेदी करता गर्दी -
सर्वत्र नाशिक जिल्ह्यामध्ये 12 मे ते 23 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, यामुळे येवल्यातील अनेक किराणा दुकानांमध्ये सकाळपासून गर्दी बघण्यास मिळाली. बजरंग मार्केट परिसरात भाजीपाला, फळे खरेदीसाठी सकाळी गर्दी झालेली होती.
पोलीस येताच गर्दी पांगापांग -
लॉकडाऊन जाहीर झाले असून देखील सणाकरता भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी बजरंग मार्केट, विंचूर चौफुली परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत विक्रेत्यांना उठण्यास सांगितले व झालेल्या गर्दीची पांगापांग केली. काहीजणांनी पोलीस दिसताच तेथून पळ काढला. गर्दी दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी सहाय्यक निरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते.