नाशिक - नाशिकमध्ये 21 ऑगस्टपर्यंत कोरोनाचे जेवढे रुग्ण वाढू शकतात, त्या तुलनेत उपचारासाठी बेडची उपलब्धता असून आरोग्य सेवा सक्षम आहे. ते बघता नाशिकमध्ये लगेच लॉकडाऊनची गरज नसल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्थनिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांना दिले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाशिकमध्ये कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, नाशकात पुन्हा लॉकडाऊन करावे अशी मागणी सर्वत्र होत आहे. मात्र, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिकमधील लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घेणे अपेक्षित आहे असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
कोरोना सेंटर असलेल्या खासगी हॉस्पिटल्समध्ये प्रशासन दोन अधिकारी उपलब्ध करुन येईल. एक अधिकारी बेड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेल तर दुसरा रुग्णांची बिले तपासून त्यांना सहकार्य करेल. तसेच नागरिकांसाठी कॉल सेंटर सुरू करण्याचे जिल्हाधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत. राज्यभरात रेमडिसिव्हरच्या गोळ्या खरेदीसाठी एकच दर निश्चित करुन तीन कंपन्याना ऑर्डर देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी थेट ही औषधे खरेदी करु शकतात. त्यात कोणतीही अडचण नाही असेही टोपे यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये कोरोना अटोक्यात आणण्यासाठी आयएमएची मदत घ्या, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकार्यांना केली.
मालेगावात प्लाझ्मा थेरपी सेंटर उभारणार...
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून, मालेगाव बऱ्यापैकी कोरोनामुक्त झाले आहे. येथील पूर्णपणे बरे झालेले पोलीस व इतरांचे प्लाझ्मा संकलीत करुन करोनाबाधितांवर उपचार केले जातील असंही राजेश टोपे म्हणाले.