नाशिक - कळवण तालुक्यातील कळवण खुर्द व शिरसमणी येथील दोन कृषी सेवा केंद्रे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून पाच लाख रुपयांचे कांदा बियाणे व रोख रक्कम लंपास केली आहे.
कळवण येथील दत्त मंदिरासमोर असलेल्या दीपक बाबाजी शिंदे यांच्या गुरुदत्त कृषी सेवा केंद्र दुकानात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी पत्र्याचे स्क्रू काढून दुकानातील पाच लाख रुपयांचे कांदा बियाणे व ५५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. तर शिरसमनी येथील जितेंद्र वाघ यांच्या यशवंत कृषी सेवा केंद्राचा पत्रा कटरच्या साहाय्याने कापून दुकानातील ३० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. कळवण पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश निकम यांनी दिली.
हेही वाचा - सहा तास पडून होता मृतदेह... शेवटी सरपंच आणि पोलीस पाटलांनी केले अंत्यसंस्कार
एकीकडे कांदा बियाण्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असताना चोरट्यांनी कांदा बियाणे चोरीकडे आपला मोर्चा वळवला असून कृषी सेवा केंद्रांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे या चोरांना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी कृषी व्यावसायिकांनी केली आहे.