नाशिक - वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे अतिरिक्त पाणी हे नाशिककडे वळविण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. वैतरणा आणि मुकणे या दोन धरणांमध्ये नवीन बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. जेणेकरून हक्काचे नाशिक पाणी हे नाशिक जिल्ह्याला मिळेल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात १४० कोटी रुपयांची कामे मंजूर -
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.२) जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.या योजनेमुळे गोदावरी खोरेची पाणी क्षमता वाढणार असून या दोन धरणांमध्ये नवीन बंधारा निर्मिती केली जाईल.जिल्ह्यात १४० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील पाणीसाठा वाढावा आणि जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी म्हणून कामे हाती घेण्यात आली आहे. अनेक कालव्याचं पुनर्भरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कालव्यांना बळकटी निर्माण होईल व जलसाठवण क्षमता वाढणार आहे.
मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती राहू नये हेच राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट -
मुंबईला जाणाऱ्या वैतरणा धरणातून नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त पाणी हे मुख्य धरणाकडे वळविण्याची योजना देखील मंजूर करण्यात आली आहे. वैतरणा आणि मुकणे या दोनच धरणांमध्ये नवीन बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. वैतरणा धरणातून मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा हा मुकणे धरणाकडे वळविण्याच्या योजनेला देखील मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाणी क्षमता वाढणार असून मराठवाड्याला पाणी देण्यासाठी अनेक योजना गतिमान करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती राहू नये हेच राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जलसंपदा विभाग पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.