नाशिक - चारचाकीने अचानक पेट घेतल्याने या घटनेत चालक गंभीररीत्या भाजल्याची घटना घडली आहे. वसाडी जवळील पिंपळगाव शिवारात चारचाकीने अचानक पेट घेतला. या घटनेत जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर मिळवले नियंत्रण
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सातपूर येथील वरचे चुंचाळे येथे राहणारे कैलास निवृत्ती शिंदे हे आपल्या चारचाकीने नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव शिवारातून रात्री नऊच्या सुमारास जात असताना त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. या घटनेत कारचालक कैलास शिंदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कैलास शिंदे यांची प्रकृती चिंताजनक
या घटनेत कैलास शिंदे हे सुमारे 80 टक्के भाजल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गाड्या पेटण्याच्या घटना घडत असल्याने, वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.