येवला (नाशिक)- येवला तालुक्यातील तांदुळवाडी येथे एका शेतकऱ्याने हौशा नावाच्या बैलाची चक्क वाजत गाजत अंत्ययात्रा काढल्याची घटना घडली. बापू पडवळ असे या शेतकऱ्याचे नाव असून यांच्याकडे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून हौशा व गौशा नावाची बैल जोडी होती. त्यातील हौशा नावाच्या बैलाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.
संपूर्ण गावात बैलाची ख्याती
संपूर्ण गावात हौशा बैलाची ख्याती होती. हौशाच्या मृत्यूची बातमी समजताच सारा गाव पडवळ यांच्या घराजवळ गोळा झाला. संपूर्ण पडवळ परिवाराने एकत्र येत 'हौशाला ढवळाबैल मना नंदी ओ राजा' या गाण्यावर वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर घराच्या जवळच असणाऱ्या महादेव मंदिरासमोर त्याचा दफविधी करण्यात आला.
हौशा बैलामुळे शेतकऱ्याची प्रगती
मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. मला लहानपणापासून पक्षांची प्राण्यांची आवड आहे. पण माझ्याकडे जो हौशा नावाचा बैल होता तो आज आपल्यातून निघून गेला. त्याला मी प्राण्यासारखे कधीच वागवले नाही. मी आणी कुटुंबाने त्याच्यावर एवढे प्रेम केले. जेवढे आपण मुलांवर करतो. हौशा पाऊस पडेपासून तर उन्हाळा सुरू होईपर्यंत राब राब राबत आला. तो कामात कधी थांबला नाही. खायला नसेल तरी तो काम करत राहीला. आज तीस पस्तीस वर्षात हौशाने मला श्रीमंत बनविले. आज माझ्याकडे ट्रॅक्टर, गाडी, धन, दौलत आहे ती हौशामुळे. अशी भावना बापू पडवळ यांनी व्यक्त केली. म्हणून आम्ही हौशाचा अंत्यविधी हा माणसासारखाच करायचे ठरवले. एवढेच नाही तर आम्ही पडवळ कुटुंब हौशाचा २२ तारखेला दशक्रिया विधीचा कार्यक्रम ठेवला असल्याचेही पडवळ यांनी सांगितले.
हेही वाचा- Live Updates : वाझे-मनसुख प्रकरण: वाझेंना अटक बेकायदेशीर; मुंबई न्यायालयात याचिका दाखल