नाशिक - सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्ट, सप्तश्रृंगी गड येथील कर्मचारी विविध मागण्यांसाठी १६ जूनला लाक्षणिक संपावर जाणार आहेत. सीटू कामगार संघटनेकडून ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ व्यवस्थापकाकडे २६ मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास संप सुरुच ठेवणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सीटू कामगार युनियनची स्थापना केली होती. दोन वर्षांपूर्वी सुमारे 125 कर्मचाऱ्यांनी सीटू प्रणित युनियनचे सभासदत्व स्वीकारले होते.
आपल्या विविध मागण्यांसाठी १६ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संपावर जाण्याचे ठरविले आहे.या संपामध्ये युनियनचे सर्व सभासद सहभागी होणार असून संप यशस्वी होण्यासाठी दिलीप पवार, नाराज आहिरे, मुरलीधर गायकवाड, प्रकाश कांबळे, राजू कांबळे, देविदास वाघमारे, संतोष पाटील, आणि भास्कर साळवे हे प्रयत्नशील आहेत.
या आहेत मागण्या-
कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट त्वरित लागू करावा. सेवाज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी फरकासह मिळावी. 12 व 24 वर्षानंतरच्या देय पदोन्नतीचा लाभ द्यावा. रिक्त पदावर सेवाज्येष्ठता व पात्रतेनुसार नियुक्ती व्हावी. कर्मचाऱ्यांना गणवेश, बूट तसेच 124 कायम कर्मचारी व 28 किमान वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनचिठ्ठी व पीएफच्या पावत्या मिळाव्यात. व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारात बाबत चौकशी करून कारवाई करावी करण्यात यावी. कामगार कल्याण अधिकारी यांचे पद निर्माण करावे. किमान वेतन कर्मचाऱ्यांना वार्षिक रजा लागू कराव्यात. कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा कुटुंबासहित मेडिक्लेम विमा करावा, आदी प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास संप सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.