नांदगांव (नाशिक) - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्याला कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. पिकांसोबत शेती वाहून गेल्यामुळे आत्महत्या केलेल्या महिलेच्या घरी जाऊन कुटुंबाचे मंत्री भुसे यांनी सांत्वन केले. यावेळी आमदार सुहास कांदे आणि शासकीय अधिकारी हेही सोबत होते.
अतिवृष्टीचा फटका बसून शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्यतील वेगवेगळ्या भागाला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि. 11 सप्टेंबर) भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासह आमदार सुहास कांदे आणि विविध विभागाचे अधिकारी देखील होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्यानंतर कृषिमंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरात लवकर नुकसानभरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.
पावसात पिकांसोबत शेती वाहून गेल्यामुळे हवालदिल होऊन आत्महत्या केलेल्या मंदाबाई यांच्या निवासस्थानी जाऊन भुसे यांनी मंदाबाईच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन भुसे यांनी केले.
हेही वाचा - नाशिक : दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 69 हजार 269 शेतकऱ्यांचे नुकसान