नाशिक - येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात चक्क बाप्पाला मास्क घालून देत कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. कोरोनाने घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून केले जात आहे.
नाशिककारांचे श्रद्धास्थान म्हणून रविवार कारंजा येथील श्री सिद्धिविनायक मंदिराची ओळख आहे. अनेक गणेश भक्तांच्या कामाची सुरुवात ही गणेशाच्या दर्शनाने होत असते. मागितलेली इच्छा आकांक्षा इथे आल्यानंतर पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा असते. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे सावट असून, या संकटातून देश बाहेर निघावा म्हणून बाप्पाला साकडं घातलं जात आहे. यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने जनजागृतीही केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून गणपती बाप्पाला मास्क लावण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांनी कोरोना व्हायरसला घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कधी बाप्पाला चंदनाचा लेप तर कधी घातले जातात उबदार कपडे
श्री सिद्धिविनायकावर अनेक भाविकांची श्रद्धा असून हिवाळ्यात जास्त थंडी पडल्यावर बाप्पाला उबदार कपडे परिधान केले जातात. तर, जास्त उन्हाळ्यात बाप्पाला गारवा मिळावा म्हणून चंदनाचा लेप लावला जातो. भाविकांच्या श्रद्धेसाठी असे विविध उपक्रम राबवले जातं असल्याचं मंदिर प्रशासनने सांगितलं आहे.
हेही वाचा - जिल्ह्यात लाखों रुपयांच्या चंदनाची कत्तल, वेळेत कारवाई न झाल्याने वन विभाग वादाच्या भोवऱ्यात
हेही वाचा - कोरोनाचा आठवडी बाजराला फटका, मनमाडला ग्राहकांनी फिरवली पाठ