नाशिक - मनमाड येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी इंधन प्रकल्पातील टँकर चालक-मालकांनी काम बंद आंदोलन केले. प्रकल्पाचे अधिकारी मनमानी करून त्रास देत असल्याचा आरोप, आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पातून टँकरद्वारे केला जाणारा पेट्रोल, डिझेलचा पुरवठा ठप्प झाला असून यामुळे इंधन टंचाई भासू शकते.
हेही वाचा - महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'
मनमाड स्थित असलेल्या पानेवाडीच्या हिंदुस्थान पेट्रोलियम इंधन कंपनीच्या टँकर चालक-मालकांनी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाला वैतागून आज सकाळी अचानक कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन करत संप पुकारला. अचानक झालेल्या या संपामुळे उत्तर महाराष्ट्रसह मराठवाडा या भागात इंधन पुरवठा खुंटला असून यामुळे आज इंधनाची चणचण भासू शकते.
प्रकल्पात असलेले अधिकारी मनमानी करत चालक वाहक व मालक यांच्यावर अरेरावी करत असल्याचे संपकरी सांगत आहेत. तर यावर ठोस निर्णय लागत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
शनिवारी आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने आज जर संप मिटला नाही तर आज आणि उद्या दोन दिवस इंधन पुरवठा होणार नाही. यामुळे इंधनाचा मोठा तुटवडा भासू शकतो. पुकारलेले आंदोलन हे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात असून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी चालक-मालक करत आहेत
हेही वाचा - महिला दिन विशेष : वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या 'सुपर रायडर' निशिगंधाने मिळवला 'हा' बहुमान!