नाशिक- घरगुती वीज ग्राहक व शेतीपंपाचे कोरोना काळातील संपूर्ण वीजबिल माफ करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. पंधरा दिवसात वीजबिल माफीची घोषणा सरकारने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे व घरगुती वीज ग्राहकांचे अतोनात नुकसान झालेले असून येत्या पंधरा दिवसात राज्य सरकारने वीजबिल माफीची घोषणा करावी. या मागणीचे निवेदन कळवण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अभियंता नितीन अंबडकर यांना देण्यात आले. पंधरा दिवसांच्या आत वीजबिल माफीची घोषणा न केल्यास मंत्र्यांना महाराष्ट्रात गावबंदी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांनी दिला आहे.
...अन्यथा नाशिक जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येत्या काही दिवसात वीज वितरण ऑफिसला टाळे ठोक अदोलन करू आणि नाशिक जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू न देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, कारभारी पाटील, भाई दादाजी पाटील, रवींद्र शेवाळे, भगवान पाटील, मनोज वाघ आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.