नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसमधून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते परत येतील, असा विश्वास आहे. मात्र, त्यांना पुन्हा प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागेल, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघर्षातून पुढे आला आहे. त्यामुळे परत एकदा मतदार संधी देतील, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
सरकाच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. रिझर्व्ह बँकेत असलेले राखीव पैसे डेव्हलपमेंटसाठी वापरण्याची वेळ सरकारवर आली आहे. देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश व टाटा सारख्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. कंपन्यांमधील अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की, नोकरी मोठ्या प्रमाणात आहेत. बेरोजगार युवकांनी मला बायोडाटा पाठवावा. मी तो मुख्यमंत्र्यांना पाठवते, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.
छगन भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या प्रश्नावर बोलण्यास सुप्रिया सुळे यांनी टाळले. शरद पवार हे 52 वर्षांपासून राजकारणात आहे. शरद पवार आणि भुजबळांकडून माझ्यावर संस्कार झाले आहेत. चौकशी, बँक आणि कारखान्यांमुळे अनेकजण पक्ष सोडून जात आहेत. मात्र, त्या व्यक्तींबद्दल माझ्या मनात कटुता नसल्याचे सुळे म्हणाल्या. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेदरम्यान छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते. तसेच भुजबळ शिवसेनेत जाणार काय? या प्रश्नाबाबत मात्र सुप्रिया सुळे यांनी बोलण्याचे टाळल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे.