नाशिक - कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेले मालेगाव आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. संपूर्ण जिल्ह्याची चिंता वाढवणारे मालेगाव आता हळूहळू पूर्व स्थितीत येत आहे. काही दिवसांपूर्वी अतिशय वाईत परिस्थितीमध्ये असलेल्या मालेगावचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. शहरातील नागरिकांचे प्रबोधन, मदतीची उभारणी आणि कोरोना विरुद्धचा संघर्ष तीव्र करण्यासाठी लोकांना सहभागी करुन घेण्यात सुनील कडासने यांनी जीवतोड प्रयत्न केले.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना राज्य सरकारने सुनील कडासने यांची कोरोना युद्धासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली. सुनील कडासने यांच्यासारख्या समाजातील विविध प्रश्नांना भिडून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे लोकांमध्ये जागृती आणि विश्वास निर्माण करण्यास मालेगाव प्रशासनाला यश आले. लोकांचा विश्वास संपादन, समस्या आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया त्यांच्या नियुक्तीमुळे मालेगावात खऱ्या अर्थाने सुरू झाली. कडासने यांच्या प्रयत्नांना शासनाने यशस्वी मॉडेल म्हणून स्वीकारले. त्यामुळे मालेगावात कोरोनाला रोखण्यात यश मिळू शकले.
मालेगावात कोरोनाचा स्फोट होत असताना नागरिकांमध्ये गांभीर्य, जागृतीचा अभाव होता. दांडगा जनसंपर्क, थेट उर्दू-अरबी भाषेत संवाद साधण्याची कला आदींचा प्रभावी वापर करून कडासने यांनी मालेगावात कोरोनाला नियंत्रणात आणण्याचे काम केले. कोरोनाच्या भीतीपोटी मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी येऊ देण्यास नाशिक, धुळ्यात झालेला विरोध, आरोग्य व्यवस्थेबद्दल जनतेत खदखदणारा असंतोष, अशा परीक्षेच्या काळात सुनील कडासने यांनी बजावलेली भूमिका राज्य सरकारने मालेगाव मॉडेलम्हणून स्वीकारली.
त्यांच्या नियोजन कौशल्यामुळे महापालिकेतर्फे 14 युनानी डॉक्टरांची नेमणूक, डॉक्टरांना संरक्षण साधने मिळाली, बंद खासगी रुग्णालये सुरू झाली, आशा सेविकांना वाढीव मानधन सुरू होऊ शकले. लॉकडाऊन काळात यंत्रमाग बंदमुळे मजुरांची होणारी उपासमार रोखण्यासाठी 6 हजार यंत्रमाग सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वी मालेगावमध्ये 4 वर्ष अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाचा कोरोना संकटात फायदा झाला, असे कडासने यांनी सांगितले.