नाशिक - त्रिपुरा येथे मुस्लीम समाजातील नागरिकांवर हल्ला झाला. तसेच काही कट्टरपंथींनी अपशब्द वापरल्याचा निषेधार्थ आज रजा अकादमी तसेच इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सुन्नी जमेतुल उलमा व रजा अकादमीसह काही मुस्लीम संघटनांनी पुकारलेल्या बंदला मालेगावात दुपारनंतर हिंसक वळण लागले, काही तरुणांनी मोर्चा काढत व्यापारी संकुलातील उघड्या दुकानांवर दगडफेक करीत दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला.
तणावपूर्ण शांतता
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.यावेळी काही संतप्त तरुणांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या वाहनांवरही दगडफेक केली. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दगडफेक करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज करत जमाव पांगावला. सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
कडक पोलीस बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लत्ता दोंदे यांच्यासह मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दगडफेक करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला. दुपारपर्यंत शांततेत सुरू असलेल्या बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागल्याने मालेगावात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, परिसर पोलीस नियंत्रणात आहे.