नाशिक - शहरात तीन ते चार दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील भुजबळ फार्म परिसरात एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. तर गंगापूर रोड, इंदिरा नगर, पंचवटी, नाशिक रोड आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमार घरफोडी आणि चोरीच्या घटना घडत आहेत. तीन दिवसात तेराहून अधिक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून घरासह किराणा दुकान आणि दवाखाने यावर चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
विविध भागातील घटनांमध्ये तीन लाखाहून अधिक मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरीच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरून गेले असून शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांना एक प्रकारे चोरट्यांनी आव्हानच दिल्याची चर्चा शहरात रंगली असून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये तसेच व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.