नाशिक- एकलहरे कॉलनीत एक आईच चिमुकल्यांसाठी वैरिणी बनली आहे. घरातली कामे वेळेत न केल्याने त्यांच्या सावत्र आईने मुलांना चटके देत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा- इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेलाही 'कोरोना'चा फटका, किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ
सावत्र आईच्या छळाला कंटाळून 12 वर्षीय मुलगा घरातून पळून गेला होता. पोलिसांनी तपास करुन मुलास शोधल्यानंतर आईच्या क्रुरतेची घटना समोर आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकलहरा कॉलनी येथून 1 मार्च रोजी 12 वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हा मुलगा एका रिक्षाचालकास मिळाला. त्याने मुलास बालसुधारगृहात दाखल केले. तेथे अधिकाऱ्यांनी मुलाची चौकशी केल्यानंतर त्याने आईबद्दलची माहिती सांगितली.
घरातील कपडे, भांडे धुणे, फरशी पुसणे, स्वच्छतागृह घासणे, घर झाडणे अशी सर्व कामे मुलाकडून आई करवून घेत होती. नाही केल्यास त्याला अमानूष मारहाण केली जात होती. दरम्यान, एक दिवस भांडी घासण्यास उशीर झाला म्हणून आईने गॅसवर उलथणे गरम करुन मुलाला चटका दिला. तसेच मुलाची लहान बहीणदेखील उभ्या-उभ्या झोपत असल्याने तिलाही चटके दिले.
मुलाच्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. भालेराव हे अधिक तपास करीत आहेत.