नाशिक - जिल्हा बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी बँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. निवृत्तीनंतरचा निर्वाह सुरक्षित होण्याच्या उद्देशाने जिल्हा बँकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवी ठेवल्या होत्या. मात्र, या ठेवी बँक परत देत नसल्याने त्या परत मिळवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा बँकेतील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्यासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ठेवी आणि त्यावरील व्याज देण्यात येत नाही आहे. याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या दोन-तीन वर्षांपासून सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्यांच्या देय रकमा निधीची कमतरता असल्यामुळे सक्तीने बँकेत गुंतविण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्यामुळे, सोमवारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघाच्या वतीने सीबीएस परिसरात असलेल्या जिल्हा बँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच बँक व्यवस्थापनाने या आंदोलनाची दखल घेत त्वरित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य केल्या नाही तर, येत्या काळात कुटुंबीयांसोबत येऊन बिर्हाड आंदोलन करण्याचा इशारादेखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युटी रक्कम ही एलआयसी ऑफ इंडियामार्फत नॅशनल बँकेकडून वर्ग होत असते. मात्र ही रक्कम बँक व्यवस्थापन संबंधित कर्मचाऱ्याला न देता परस्पर खात्यात जमा करत असल्याचा आरोपदेखील यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. याचबरोबर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी रक्कमही लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांनी केली आहे.
हेही वाचा - हैप्पी बर्थडे शेरा'... नाशिकमध्ये पोलीस दलातील श्वनाचा अनोखा वाढदिवस साजरा