नाशिक - राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे मौनव्रताला अचानक बसल्याने प्रशासकीय स्तरावर धावपळ सुरू आहे. परंतु, अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले जात असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोरोनाचा विस्फोट झालेल्या मालेगाव शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. प्रशासकीय अधिकारी नियमित आढावा बैठक घेत असले तरी प्रत्यक्षात निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने कृषिमंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे.
आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कृषिमंत्री भुसे हे त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरील हनुमान मंदिरात आले, तर काही निवडक पदाधिकारी थोड्या अंतरावर शांत उभे राहिले. कुणाचाच कुणाशी संवाद नाही. चिंताजनक व नाराजीयुक्त असे एकंदर वातावरण असताना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी दाखल होऊन चर्चा झाली. मात्र, वृत्तांत जाहीर न झाल्याने गूढ वाढले आहे.
शहरात कोरोनाने थैमान घातले असताना वारंवार बैठकाही होतात. परंतु, अपेक्षित परिणाम दिसत नाही. प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात त्रुटी राहत असल्याचा सूर उमटत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी संकटमोचन हनुमानाला साकडे घातल्याचे सांगितले जात आहे.