नाशिक - ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या काळात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने ही बाब ओळखून नाशिकच्या ग्रामीण भागात 33 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. या माध्यमातून 45 हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागातील जलाशय पाण्यामुळे आटून गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचा प्रश्न बिकट बनला आहे. गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील तलाव, विहिरी, तळी ह्या ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत उन्हामुळे आटून गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे पाणी भरण्याची जबाबदारी महिला वर्गावर असल्याने तळपत्या उन्हात त्यांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे.
प्रशासनने ही बाब लक्षात घेत नाशिक जिल्ह्यातील येवला, पेठ, सुरगाणा, बागलाण, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, देवळा या सात तालुक्यातील 54 गावे 22 वाड्या अशा एकूण 76 ठिकाणी 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. या ठिकाणच्या 45 हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे. 35 टँकरद्वारे 70 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून तेथे पाणी पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने विहिरी केल्या अधिग्रहित
काही गावातील विहिरीमधे मुबलक प्रमाणात पाणी असते. मात्र या विहिरी खासगी मालकीच्या असल्या, तरी टंचाई काळात प्रशासन त्या गावकऱ्यांसाठी अधिग्रहित करता येतात. अशा 59 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी 49 विहिरी गावासाठी आणि 10 विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात किती सुरू आहेत टँकर
तालुका | गावे | टँकर | |
देवळा | 3 | 2 | |
बागलाण | 3 | 2 | |
सुरगाणा | 18 | 7 | |
पेठ | 17 | 7 | |
येवला | 25 | 13 | |
नांदगाव | 1 | 1 | |
त्र्यंबकेश्वर | 9 | 3 | |
एकूण | 76 | 35 |