नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोज शेकडो बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. अत्यवस्थ असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्हा शासकीय रुग्णालयात काळबाजार होत असल्याचे समोर आले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ह यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला. अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आले होते. भुजबळांनी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवू नये व काळाबाजार रोखण्यासाठी शहरातील दोन शासकीय रुग्णालये आणि तीन खासगी तीन रुग्णालयांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता शासकीय रुग्णालयातचं रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले.
रेमडेसिवीरची छुप्या मार्गाने विक्री -
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाचा हा प्रयत्न आहे. ज्या रुग्णाला रेमडेसिवीरची गरज भासते त्याला पाच रुपये किमतीचे हे इंजेक्शन येथे मोफत दिले जाते. या इंजेक्शनचा शासकीय रुग्णालयातून काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रेमडेसिवीरच्या या रॅकेटमध्ये जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रेमडेसिवीर देण्याची कशी असते प्रक्रिया -
जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला रेमडेसिवीरची आवश्यकता आहे की नाही हे ठरवले जाते. ड्युटीवर असलेल्या परिचरिकेला याची नोंद घेण्यास सांगितले जाते. संबधीत कर्मचारी रुग्णाला रेमडेसिवीरची गरज असल्याचे पत्र तयार करतात. ते पत्र कोविड बाधितांच्या औषध भंडारामध्ये पाठवले जाते. संबधीत रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाचे आधार कार्ड व माहितीचा तपशील देण्यास सांगितले जाते. त्यानंतर हे इंजेक्शन रुग्णाच्या कक्षात पाठवले जाते. एका बाधिताला दोन ते सहा रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासू शकते. रुग्णांच्या नावाने रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन प्रत्यक्षात ते रुग्णाला दिले जात नाही, अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.