नाशिक - राज्यात अघोषित लाॅकडाऊन लावल्यामुळे व्यापारी संघर्षाच्या पवित्र्यात आहे. त्याचपोठोपाठ आता रेशन दुकानदार संघटनेने राज्य शासनाविरुद्ध दंड थोपाटले आहे. कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्या रेशन दुकानदारांना आर्थिक मदत तसेच विमा संरक्षण कवच द्या, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास येत्या १ मेपासून धान्य वाटप बंद करत संपावर जावू, असा इशारा रेशन दुकानदारांनी दिला आहे.
विमा कवच कधी?
कोरोनाच्या संकट काळात मोफत धान्य वाटप करतांना मृत्यूमुखी पडलेल्या दुकानदारांना आर्थिक मदत तसेच शासानकडून विमा कवच मिळावे, अशी मागणी वारंवार करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. राज्यात ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदार असून त्यांनी कोरोना संकट काळात शासनाची मोफत धान्य योजना रेशनकार्ड धारकांपर्यंत पोहोचवले आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत न मिळताही रेशन दुकानदारांनी त्याचे कर्तव्य बजावत सहकार्याची भूमिका घेतली होती. मध्यंतरी शासनाने रेशन दुकानधारकांना विमा कवच देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अद्याप हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
..तर धान्य वाटप बंद
राज्य रेशनदुकानदार संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आर्थिक मदतीची मागणी करण्यात आल्यानंतरही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. येत्या १ मेपासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाननारांनी धान्य वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-ऐन महामारीत डाळीसह पालेभाज्या महाग; गृहिणींचे कोसळले बजेट