नाशिक- महाराष्ट्राच्या आगामी मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना भाजपात कलगीतुरा सुरू असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनमाडला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे ठामपणे सांगितले.
काही दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहे. तिकडे भाजपाचे नेते मुख्यमंत्री पदावर आमच्या माणूस बसेल असे सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना देखील मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे ठरले आहे. या पलीकडे काही बोलत नाहीत. मात्र, दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहेत. त्यामुळे अखेर सेना-भाजपचे ठरले तरी काय अशी चर्चा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यां मध्ये आहे.
युवानेते आदित्य ठाकरे यांनी काढलेली आशीर्वाद यात्रा मनमाड शहरात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला युवा नेता मिळाला असल्याचे सांगितले. तसेच सर्वच जाती-धर्माचे लोक त्यांच्याकडे आशेने पाहत असून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे सांगितले. एक प्रकारे आगामी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केल्याचे दिसून आले.