नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपकडे असलेल्या नाशिक-पश्चिम मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवक पदासह शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. तर याबरोबरच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.
हेही वाचा - 'अंबा एक्सप्रेस'मध्ये तळीरामांसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांची रंगली दारू पार्टी
मागील दोन पंचवार्षिक आधी नाशिक-पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. कष्टकरी कामगार वस्तीचा भाग म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. अंबड आणि सातपूर हा औद्योगिक क्षेत्राचा भाग देखील या मतदारसंघात येतो. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात मनसेचे नितीन भोसले निवडून आले होते. यानंतर 2014 मध्ये भाजपच्या चिन्हावर सीमा हिरे या आमदार झाल्या होत्या.
हेही वाचा - कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय...
यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून भाजप सोबत शिवसनेच्या अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. मात्र, युती झाल्यास शिवसेनेला ही जागा सुटणार नाही, असे गृहीत धरून शिवसेनचे जुने पदाधिकारी नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवक पदासह शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही वर्षात आर्थिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती ढासळली आहे. तर 40 ते 50 टक्के कंपन्या बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.
हेही वाचा - अंजनगाव सुर्जीमध्ये अवैध सागवान साहित्य जप्त; वन विभागाची कारवाई
नंदिनी नदीचा प्रदूषणाचा प्रश्न, मतदारसंघात असलेल्या 12 खेड्यांचा खुंटलेला विकास या सर्व प्रश्नांसाठी मी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे दिलीप दातीर यांनी म्हटले आहे. तर नाशिक-पश्चिम मतदारसंघातुन दातीर बंडखोरी करत निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याने युतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढणार आहेत.