नाशिक - केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ कमी केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. याबाबत आज (शुक्रवारी) नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंल्पात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या किंमती घट होईल, अशी सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्प आल्यानंतर नागरिकांची निराशा झाली. हाच मुद्दा घेऊन शिवसेनेने राज्यभर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढ विरोधात धरणे आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला.
हेही वाचा - जगविख्यात लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
अक्कड, बक्कड बंबे बो 80-90 पुरे 100 -
अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल दरवाढीवर निर्णय होऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 93 रुपये 57 पैसे तर डिझेलची 82 रुपये 77 पैस लिटर दराने विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. शिवसेनेकडून या इंधन दरवाढी विरोधात मार्मिक बॅनर लावण्यात आले आहे. नाशिकच्या मध्यवर्ती शिवसेना कार्यालयाबाहेर असा एक बॅनर लावण्यात आला आहे. अक्कड, बक्कड बंबे बो 80-90 पुरे 100 असे म्हणत पेट्रोल दरवाढी-विरोधात शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच हेच का अच्छे दिन? असा प्रश्न उपस्थित करत बॅनरच्या माध्यमातून टीका केली आहे.