नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सरकारच्या कामगिरीबद्दल सांगण्यासारखे काही नाही. म्हणून ते गांधी घराण्यावर टीका करत आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते.
मोदी प्रत्येक ठिकाणी म्हणतात, की पुलवामाचा बदला घेतला. कारवाई लष्कराने केली आणि हे ५६ इंच छाती फुगवतात हे योग्य नाही. अभिनंदनला सोडवले आहे याचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र, कुलभूषणला का नाही सोडवले? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. हेलिकॉप्टर पडल्याने मांडवगणे यांना वीरमरण आले, याचा आम्हाला अभिमान आहे. पण सरकारने याचे राजकारण करू नये, असे त्यांच्या कुटुंबांनी मला भेटीदरम्यान सांगितले असल्याचे पवार म्हणाले.
माझ्या कुटुंबाची काळजी करु नका -
एकीकडे मोदी माझ्यावर टीका करतात. पुतण्याने पक्ष ताब्यात घेतला. माझी मोदींना विनंती आहे मला कुटुंब आहे. त्यांना कुटुंब नाही. त्यामुळे त्यांनी कुठलीही टिपणी करू नये. देशाची काळजी करा. माझ्या कुटुंबाची नका.
देशासाठी तुमचे योगदान काय?
नेहरूंनी देशासाठी ११ वर्ष तुरुंगात घालवली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशांसाठी बलिदान दिले. तुमचे देशासाठी काय योगदान आहे ? असा सवाल पवार यांनी मोदींना विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सरकारच्या कामगिरीबद्दल सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून ते गांधी घरण्यावर टीका करत असल्याचेही पवार म्हणाले.
शेतीमालाला योग्य भाव हवा -
उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना घामाची किंमत मिळायला हवी. या सरकारने गहू व तांदळाच्या दरात अत्यल्प वाढ केली आहे. मोदी सरकारने सर्व शेती माल उत्पादनात आघाडी सरकारच्या तुलनेत अत्यल्प वाढ केली आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नात वाढ केल्याचा मोदी सरकारचा दाव खोटा आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे पवार म्हणाले.
या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डी. पी. त्रिपाठी, मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.