नाशिक - येवला तालुक्यातील नगरसुल भागात राहणारे कृष्णा डोंगरे हे महिनाभरापासून अर्धनग्न आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध करत आहे. मात्र, प्रशासनाने डोंगरे यांच्यावर निवडणूक काळात आचारसंहिताभंगाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर मात्र, शरद पवार यांनी डोंगरे यांना विंचूर येथे झालेल्या प्रचार सभेत मंचावर बोलावून विचारपूस केली.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदी सरकार विरोधात नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल भागात राहणारे कृष्णा डोंगरे यांनी गेल्या महिनाभरापासून अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. सरकार फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देत असून त्यांच्यासाठी काहीच करत नसल्याचे डोंगरे यांचा आरोप आहे. मात्र, त्याच्या या अर्धनग्न आंदोलनावर प्रशासनाने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत कारवाई केली. त्यानंतर पवार यांनी डोंगरे यांना विंचूर येथील सभेच्या मंचावर बोलावून चौकशी केली.
मी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत असून सरकार पोलिसांच्या मदतीने माझे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. पिंपळगाव येथे झालेल्या मोदींची सभा ऐकण्यासाठीसुध्दा मला पोलिसांनी मज्जाव केल्याचे सांगत एक दिवस पोलीस ठाण्यात बसून ठेवल्याचा आरोप देखील डोंगरे यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचे डोंगरे म्हणाले. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत असतानाही सरकारला माझी भीती वाटत असून आचारसंहिता भंगाची कारवाई करत, माझी तडीपारीची नोटीस काढल्याचे डोंगरे यांनी सांगितले.